कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीची माहिती देणारी ‘सिंहस्थ संवाद’ मालिका सोमवारपासून आकाशवाणीवर

नाशिक : नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. याच तयारीची आणि सुविधांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिक आकाशवाणी केंद्रावरुन ‘सिंहस्थ संवाद’ या विशेष मालिकेचे प्रसारण 20 जुलै 2015 पासून करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाची निर्मिती असलेली ‘सिंहस्थ संवाद’ ही विशेष मालिका 20 जुलैपासून दररोज सकाळी 8.55 ते 9.10 वाजता या वेळेत प्रसारित होणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त प्रशासनाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे विविध सुविधांची उभारणी केली आहे. कायमस्वरुपी कामे पूर्ण झाली असून तात्पुरती कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. कुंभमेळा सुरु झाल्यानंतरच्या काळात साधू-महंत आणि भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांचे सूक्ष्म नियोजन प्रशासनाच्या विविध यंत्रणांनी केले आहे. या सर्व पूर्व तयारीची आणि निर्माण करण्यात आलेल्या सुविधांची माहिती संबंधित विभाग, यंत्रणांचे प्रमुख जनतेला आकाशवाणीच्या ‘सिंहस्थ संवाद’ मालिकेतून देणार आहेत.

सोमवार, 20 जुलै रोजी सकाळी 8.55 वाजता ‘सिंहस्थ संवाद’ या मालिकेच्या प्रसारणास नाशिक आकाशवाणी केंद्रावरुन प्रारंभ होणार आहे. या मालिकेच्या विविध 40 भागात पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, कुंभमेळा कक्षाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, मेळा अधिकारी महेश पाटील, उदय किसवे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्ष गाडिलकर, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.बी.डी. पवार, एस.टी.च्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंके, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एम.के. पोकळे, महापालिकेचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे, महावितरणचे अधिक्षक अभियंता आर.डी. चव्हाण, महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश महाजन, भारत संचार निगमचे महाव्यवस्थापक सुरेश प्रजापती आदी विभागप्रमुख कुंभमेळ्यानिमित्त साधू, महंत, भाविकांसाठी निर्माण केलेल्या विविध सुविधा, उपाययोजनांची माहिती श्रोत्यांना देणार आहेत.


सोमवार 20 जुलै ते 29 ऑगस्ट 2015 या कालावधीत दररोज सकाळी 8.55 वाजता नाशिक आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या ‘सिंहस्थ संवाद’ मालिकेचा जनतेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Excellent response from passengers for Railway Ticket Reservation Mobile Van

‘सिंहस्थ संवाद’ : महान्यूजच्या माध्यमातून