‘सिंहस्थ संवाद’ : महान्यूजच्या माध्यमातून

अवश्य भेट द्या... http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=UYaL39U+swU=


ज्ञान आणि अध्यात्म यांची पर्वणी असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला 14 जुलै 2015 ला ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. विविध आखाड्यांच्या साधू-महंतांबरोबरच देश-विदेशातून भाविक, पर्यटकांच्या आगमनाने नाशिक-त्र्यंबकेश्वरनगरी गर्दीने गजबजू लागली आहे. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांबरोबरच या ‘महापर्वा’त सहभागी होणाऱ्या साधू-महंतांना विविध सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने केलेली तयारी आता जवळपास पूर्णत्वास जाऊ लागली आहे. प्रशासनाने केलेली तयारी त्यातून निर्माण झालेल्या सुविधांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘महान्यूज’ च्या माध्यमातून ‘सिंहस्थ संवाद’ चा उपक्रम आजपासून सुरु होत आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पहिले शाही स्नान 29 ऑगस्ट 2015 रोजी तर दुसरे शाही स्नान 13 सप्टेंबर 2015 रोजी होणार आहे. तिसरे शाही स्नान नाशिक येथे 18 सप्टेंबर 2015 रोजी तर त्र्यंबकेश्वर येथे 25 सप्टेंबर 2015 रोजी होणार आहे. या शाही स्नानाच्या आणि एकूणच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने या दोन्ही तीर्थक्षेत्री येणारे साधू-महंत, भाविकांसाठी शासनाने नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे विविध सुविधांची उभारणी केली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस.टी. आणि रेल्वे सज्ज झाली आहे. भाविकांना स्नानासाठी नाशिक येथील सात तर त्र्यंबकेश्वर येथील तीन घाटांवर जाण्यासाठी वाहतुकीचे आणि रस्त्यांचे व्यवस्थापन पूर्ण झाले आहे. त्यासाठी आवश्यक अंतर्गत आणि बाह्य वाहनतळांची उभारणी देखील आता अंतिम टप्प्यात आहे. घाटांच्या सुशोभिकरणाबरोबरच त्यांच्या स्वच्छतेची देखील कामे युद्धपातळीवर सुरु आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील रस्ते चकचकीत झाले आहेत. साधुग्राममध्ये आरोग्य, विद्युत, पाणी, स्वच्छता सुविधा निर्माण झाल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दल सज्ज झाले आहे. कायदा-सुव्यवस्था आणि एकूणच सुरक्षेसाठी पोलिसांबरोबरच फोर्सवन, क्यूआरटीसारख्या सुसज्ज पथकांच्या तैनातीचे नियोजन पूर्ण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, भाविकांना सूचना देण्यासाठी सार्वजनिक ध्वनीक्षेपण यंत्रणा कार्यान्वित झाले आहे. अशा विविध कामांची, सुविधांची आणि तयारीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरु होणारे ‘सिंहस्थ संवाद’ निश्चितच माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरणार आहे. 


-किशोर गांगुर्डे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Excellent response from passengers for Railway Ticket Reservation Mobile Van

कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीची माहिती देणारी ‘सिंहस्थ संवाद’ मालिका सोमवारपासून आकाशवाणीवर