लोकाभिमुख निर्णय, शासकीय कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी जळगाव जिल्हा माहिती कार्यालय ‘फेसबुक’वर...
२१०० लाईक्सचा टप्पा ओलांडला ; नेटकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव, दि.४- राज्य शासनाचे विविध लोकाभिमुख
निर्णय, शासकीय कार्यक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाच्या माहिती
व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाने ‘फेसबुक’ पेज तयार
केले असून या पेजला अल्पावधीतच २१०० पेक्षा अधिक लाईक्स देऊन जळगावकरांनी पसंती
दिली आहे.
सोशल नेटवर्किंग साईटसची लोकप्रियता आणि वाढता वापर लक्षात घेऊन आणि माहिती
व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्या सोशल मिडीयाचा अधिकाधिक
वापर करण्याच्या आवाहनावर जिल्हा माहिती अधिकारी किशोर गांगुर्डे यांच्या
संकल्पनेतून जिल्हा माहिती कार्यालयाचे स्वतंत्र फेसबुक पेज (www.facebook.com/jalgaon.dio)
तयार करण्यात आले आहे. जिल्हाभरात होणारे विविध शासकीय कार्यक्रम, पालकमंत्री ना.
श्री. एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येणाऱ्या मान्यवरांच्या कार्यक्रमांचे अचूक वृत्त व दर्जेदार छायाचित्रे
माध्यमांपर्यंत तसेच जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या फेसबुक पेजचा चांगला उपयोग होत
आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सामान्य जनतेच्या माहितीसाठी
माध्यमांद्वारे प्रसृत केल्या जाणाऱ्या विशेष बातम्या, छायाचित्रे, लेख, व्हिडीओ,
मंत्री महोदयांचे दौरे, शासनाशी संबंधित विविध कार्यक्रम, बैठकांची वार्तांकने,
माहिती, शासकीय योजना, यशकथा या पेजवर वेळोवेळी अपडेट केली जातात, त्यामुळे या
पेजला चांगली पसंती मिळत आहे. लवकरच या कार्यालयाचा स्वतंत्र ब्लॉग देखील
कार्यन्वित होणार असल्याचे माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी सांगितले.
सोशल नेटवर्किंग साईटसचा कल्पकतेने वापर करुन जिल्ह्यातील पत्रकार,
माध्यमप्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभाग आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी
जिल्हा माहिती कार्यालयाने हे पेज सुरु केले आहे. केवळ बातम्या, छायाचित्रे किंवा
शासकीय कार्यक्रमांची प्रसिद्धी न करता शासकीय योजनांचे लेख, यशकथा, योजनांची
माहितीदेखील या पेजवर प्रसिद्ध केली जात असल्याने सामान्य जनतेकडूनही याला मोठी
पसंती मिळत आहे. दिवसेंदिवस ‘लाईक्स’चा टप्पा वाढत असून या फेसबुक पेजला पसंती
देणाऱ्यांमध्ये विद्यार्थी, नोकरदार, विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांबरोबरच महिला
वर्गाचा देखील मोठा समावेश आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा