भाविकांना स्नानासाठी मार्गनिहाय स्वतंत्र घाट
नाशिक येथे सात तर त्र्यंबकेश्वरात तीन आकर्षक घाटांची उभारणी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात असून यावर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने मुख्य पर्वणीच्या स्नानासाठी स्वतंत्र घाटांचे नियोजन केले आहे . या स्वतंत्र घाटांमुळे भाविकांना शांततेत आणि विनासायास स्नान करणे सुकर होणार आहे . नाशिक येथील सात आणि त्र्यंबकेश्वर येथील तीन घाटांवर स्नानासाठी येणारे भाविक प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गांवरुनच येणार असल्याने गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे . सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी देश - विदेशातील लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरला येतात . पारंपारिक शाही स्नानाचे ठिकाण असलेल्या नाशिकच्या गंगाघाटावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर यावर्षी पर्वणीच्या काळात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून नाशिक शहरात 7 आणि त्र्यंबकेश्वर येथे तीन घाटांवर स्नानाचे नियोजन केले आहे . नाशकात रामकुंड, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर, लक्ष्मीनारायण, टाकळी संगम, नांदूर आणि दसक पंचक या सात रामघाटांवर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे ....