त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तात स्नानासाठी नितळ,स्वच्छ पाणी
अडीच कोटी रुपये खर्चून जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यन्वित
नाशिक,
दि.24– सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना कुशावर्त कुंडात स्नानासाठी आता शुद्ध
पाणी उपलब्ध होणार असून त्यासाठी दरताशी एक लाख लीटर जलशुद्धीकरण करणारी यंत्रणा महाराष्ट्र
जीवन प्राधिकरणाच्या वतीने कार्यन्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे आता जलशुध्दतेच्या
मानकानुसार 3.0 मिलिग्रॅम/लीटर बीओडी (बॉयोलॉजिकल
ऑक्सिजन डिमांड) इतके शुद्ध, स्वच्छ, नितळ पाणी कुशावर्त कुंडात उपलब्ध होऊ लागले
आहे.
सिंहस्थ कुंभमेळा आता काही दिवसांवर
येऊन ठेपला असून या कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा
पुरविण्यासाठी प्रशासनाची सुरु असलेली तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सिंहस्थ-कुंभमेळा
काळात त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होती, तर अनेक
भाविक स्नानाबरोबरच तीर्थ म्हणूनही इथले पाणी सोबत घेऊन जातात. कुशावर्त कुंडाची
क्षमता 9 लक्ष लीटर असून या कुंडात गंगासागर तलावातून पाणी पुरवठा केला जातो. गर्दीच्या वेळी अनेकदा या कुंडातील पाणी अशुद्ध होऊन जलशुद्धतेच्या मानकानुसार त्याची बॉयोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड 35 एमजी/लिटर पर्यंत
वाढते. कुशावर्त कुंडातून प्रत्येक वेळी हे पाणी बाहेर फेकणे आणि नवीन पाणी घेणे, यात
प्रशासनाला मर्यादा यायच्या, मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने या पाण्याची
शुद्धता वाढविण्याचा 2 कोटी 49 लाख रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेतला, तो पूर्ण केला
आणि त्याची चाचणीदेखील यशस्वी झाली आहे.
नव्या जलशुद्धीकरणाच्या यंत्रणेनुसार
आता प्रत्येक तासाला कुशावर्त कुंडातील एक लक्ष लीटर पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पाठविले
जाऊन त्या पाण्याचे तेथे शुद्धीकरण केले जाईल. त्यावर प्रेशर सॅन्ड फिल्टर, ॲक्टिव्हेटेड
कार्बन फिल्टर, अल्ट्रा व्हॉयोलेट ट्रीटमेन्ट आणि ओझोनायझेशन आदी प्रक्रिया केल्या
जातील. स्विमिंग पूलामध्ये ज्याप्रमाणे जलशुद्धीकरणाची व्यवस्था केली जाते तशी व्यवस्था
सतत 24 तास या कुशावर्त कुंडात अविरतपणे सुरु राहिल, त्यामुळे या कुंडातील पाण्याची
बीओडी 35 एमजी/लिटरवरुन थेट 3 एमजी/लिटर बीओडी इतकी कमी होईल परिणामी कुंडात स्वच्छ,
शुद्ध आणि नितळ पाणी भाविकांना स्नानासाठी उपलब्ध होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. देवेंद्र लांडगे यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळा काळात आणि विशेषतः
पर्वणीच्या दिवशी ही जलशुद्धीकरण यंत्रणा अविरतपणे सुरु राहण्यासाठी प्रभारी मुख्य अभियंता श्री. देवेंद्र लांडगे यांच्या
मार्गदर्शनाखाली अभियंते-तंत्रज्ञ-कारागीर यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. एकूणच, कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरनगरीत येणाऱ्या
भाविकांना आता स्नानासाठी शुद्ध-स्वच्छ-नितळ पाणी
मिळणार असल्याने जलशुद्धीकरणाचा हा उपक्रम नाविण्यपूर्ण ठरेल, हे निश्चित…
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा