नाशिक-त्र्यंबकेश्वरला ‘महावितरण’चा अखंडित वीजपुरवठा

तपोवन, गणेशवाडीत नवीन उपकेंद्रे ; आठ नियंत्रण कक्ष 

नाशिक, दि.11- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने विविध उपाययोजना केल्या असून तपोवन व गणेशवाडीतील नवनिर्मित उपकेंद्रे कार्यन्वित केले आहे तर  भूमिगत वाहिन्यांच्या व्यवस्थापनासह वीजपुरवठ्याच्या अचानक उद्भवणाऱ्या समस्यांवर तात्काळ उपायांसाठी ‘महावितरण’ सज्ज झाले आहे. 




नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध विद्युतीकरणाच्या कामांसाठी सिंहस्थ आराखड्यात सुमारे  24.56 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.नाशिक शहरासाठी साधारणपणे 166 मेगावॅट तर त्र्यंबकेश्वरसाठी 13.04 मेगावॅट इतका विद्युतभार अपेक्षित आहे. त्यात साधुग्राम, वाहनतळे, घाट परिसर, पोलीस बराकी, चौक्या, वॉच टॉवर्स आदींचा समावेश आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मिळून सध्याची वीजेची क्षमता साडेपाचशे मेगावॅट असून अतिरिक्त क्षमता 25 मेगावॅट इतकी आहे. या दोन्ही ठिकाणी 247 रोहित्र अस्तित्वात असून नव्याने नाशिकमध्ये 38 तर त्र्यंबकेश्वर येथे 24 रोहित्र बसविण्यात आले आहेत. आहे. सध्या अस्तित्वातील 46 रोहित्रांची क्षमता वाढविण्यात आली आहे.
नाशिक शहरात रामकुंड, गणेशवाडी, साधुग्राम येथे उपकेंद्र असून त्याशिवाय तपोवन आणि गणेशवाडी येथे 33/11  केव्ही, 10 एमव्हीए क्षमतेची  दोन नवीन उपकेंद्रे कार्यन्वित करण्यात आली आहेत. तपोवनमधील उपकेंद्र हे भविष्यातील 100 वर्षांचा विचार करुन उभारण्यात आले असून याचा कुंभमेळ्यासाठीच कायमस्वरुपी वापर होणार आहे. या भागात पूर्वी गणेशवाडी, मेरी, टाकळी येथून वीजपुरवठा व्हायचा. तपोवन उपकेंद्रामुळे या भागाने वीजेचा दाब योग्य राहण्यास मदत होणार आहे.  लक्ष्मीनारायण पूल ते कन्नमवार पूलादरम्यान गोदावरी नदीच्या घाटावर असलेल्या पाच उच्चदाब विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आलेल्या आहेत. साधुग्राम, शाही मार्ग आदी भागातील गर्दी आणि वर्दळ लक्षात घेता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणच्या उच्च व कमी दाब वीजवाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत, असे महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. आर.डी. चव्हाण यांनी सांगितले.
रामकुंड परिसरात मेरी उपकेंद्रातून होणारा विद्युतपुरवठा खंडित झाल्यास गणेशवाडी येथील नवीन उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. एकलहरे उपकेंद्रात बिघाड झाल्यास चाळीसगाव, मनमाड, बाभळेश्वर किंवा नवसारी येथील 220 किलोवॅट क्षमतेच्या उपकेंद्रातून वीजपुरवठा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरातील टाकळी, मेरी, आडगाव ही उपकेंद्रे रिंग सिस्टिमद्वारे जोडण्यात आली आहेत. खंबाळे ते त्र्यंबकेश्वर या 13 कि.मी. च्या लांबीची वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. त्याशिवाय त्र्यंबकेश्वर येथील अहिल्या घाटावर 400 वॅट क्षमतेचे 16 फ्लडलाईट लावण्याचे काम सुरु आहे. 
साधुग्राम सेक्टर 1, तपोवन, मेरी, सिव्हिल, गणेशवाडी, टाकळी, त्र्यंबकेश्वर आणि खंबाळे येथे नियंत्रण कक्ष कार्यन्वित करण्यात येणार असून त्याद्वारे संबंधित भागातील वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. कुंभमेळा काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे शंभरपेक्षा अधिक अभियंते आणि इतर तांत्रिक कर्मचारी असे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहेत. नाशिक, त्र्यंबकेश्वरबरोबरच कावनई, वणी येथेही वीजपुरवठ्याच्या कामासाठी 61 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता, त्यातून महत्त्वाची सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
कुंभमेळा काळात नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर  परिसरात वीजेचे कोणतेही भारनियमन होणार नाही याची दक्षता ‘महावितरण’ने घेतली असून वीजपुरवठ्यासंदर्भात उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणीवर मात करुन सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ‘महावितरण’ सज्ज झाले  आहे.
00000


किशोर गांगुर्डे, नाशिक, दिनांक 11 ऑगस्ट 2015

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Excellent response from passengers for Railway Ticket Reservation Mobile Van

‘सिंहस्थ संवाद’ : महान्यूजच्या माध्यमातून

कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीची माहिती देणारी ‘सिंहस्थ संवाद’ मालिका सोमवारपासून आकाशवाणीवर