दर्जेदार वैद्यकीय सेवेसाठी सज्ज झाली आरोग्य यंत्रणा

नाशिक-त्र्यंबकेश्वरला साईड आयसीयूबरोबरच अतिरिक्त दवाखाने, रुग्णवाहिका

नाशिक, दि. २७-   सिंहस्थ कुंभमेळा काळात भाविकांना उत्कृष्ट, दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून पर्वणीकाळात आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास   तातडीच्या रुग्णसेवेसाठी  नाशिकमध्ये आठ तर त्र्यंबकेश्वर येथे चार ठिकाणी तात्पुरतेसाईड आयसीयूउभारण्यात येणार आहेत. नाशिकच्या पंचवटी कारंजा आणि तपोवन इथे स्वतंत्र रुग्णालय कार्यन्वित झाले असून ठराविक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हेल्थ डिस्पेन्सरी सुरु करण्यात आल्या आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिक त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन त्यांना आवश्यक त्या दर्जेदार वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री श्री. गिरीष महाजन यांनी प्रारंभापासूनच विशेष लक्ष पुरवले असून आरोग्य  उपसंचालक डॉ. बी.डी.पवार यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाची सध्या ५४१ बेड्सची क्षमता असून अतिरिक्त २०० बेड् वाढविण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्येही नव्याने अतिरिक्त ७० बेड्सचा विस्तार करुन रुग्णालयाची  क्षमता १०० बेड्सची करण्यात आली आहे.

नाशिक शहरातील पंचवटी कारंजा येथे ११२ बेड्सची क्षमता असलेले इंदिरा गांधी रुग्णालय अतिदक्षता विभागासह कार्यन्वित करण्यात आले आहे, तर तपोवन परिसरात १०० बेडचे रुग्णालय सुरु करण्यात आले आहेरामकुंड वस्त्रांतर गृह, लक्ष्मीनारायण मंदिर, साधुग्राम सेक्टर डी, २ सी, २ या पाच ठिकाणी  दवाखाने सुरु झाले आहेत तर रामकुंड, इंदिरा गांधी  रुग्णालय, तपोवन रुग्णालय, लक्ष्मीनारायण मंदिर येथे रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. शहरी आरोग्य सेवा केंद्र, नाशिक, नाशिकरोड, सातपूर, सिन्नर फाटा, सिडको, संत गाडगेबाबा महाराज कथडा, आरसीएच केंद्र गंगापूर, इंदिरा गांधी हॉस्पिटल या ठिकाणी  आपत्कालिन पथके देखील तैनात ठेवण्यात आले आहेत.
तीनही पर्वणीच्या  काळात  नाशिक येथे विशेष आरोग्य सेवा पुरविण्यात येणार असून स्नान घाट, अंतर्गत  आणि बाह्य वाहनतळांच्या परिसरात ३२ दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. शाही मिरवणूक मार्ग, घाटांचा परिसर, रुग्णालये, वाहनतळांचा परिसर तसेच नाशिक शहरात विविध ठिकाणांहून येणाऱ्या मार्गांवर ९३ रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. त्याशिवाय गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी एकमुखी दत्त मंदिर, बालाजी घाट, आयुर्वेद रुग्णालय, कपिला गोदावरी संगम घाट, नासर्डी संगम, कन्नमवार पूल घाट, नांदूर घाट, दसक घाट याठिकाणी अतिदक्षता विभाग (साईट आयसीयू) उभारण्यात येणार आहेत. त्याशिवाय पर्वणीकाळात ८२ फिरते दवाखानेही सुरु केले जाणार आहेत, असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी.आर.गायकवाड यांनी सांगितले.

आपत्कालिन वैद्यकीय सेवेच्या १०८ हेल्पलाईनच्या सुमारे दीडशेच्या आसपास रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक खाजगी, स्वयंसेवी संस्थांच्या देखील रुग्णवाहिका मदतीस आहेत. अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणाली असलेल्या ३५ एएलएस ॲम्ब्युलन्स सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत, त्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांसाठी आवश्यक तपासणी उपकरणे, ईसीजी, मॉनिटर, डिफोबिलिटर, व्हेन्टीलेटर,स्ट्रेचर, ऑक्सिजन आदी उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याशिवाय ४० मुलभूत जीवनरक्षक प्रणाली असलेल्या रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या आहेत. या सर्वच रुग्णवाहिकांना जीपीआरएस प्रणालीने जोडण्यात आले असून एरवी पुण्यात होणारे जीपीआरएस ट्रेकिंग आता कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये होणार आहे. कुंभमेळ्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, पारिचारिका, एक्सरे टेक्निशियन आदी ४०० पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील १४ रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा राहील, या दृष्टीने आरोग्य विभाग स्वयंसेवी संस्थांच्या संपर्कात आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले

त्र्यंबकेश्वर येथे ११ ठिकाणी कायमस्वरुपी डिस्पेन्सरीज चोवीस तास अहोरात्र कार्यरत असतील. कुशावर्त परिसरात वैद्यकीय पथकाबरोबरच साईड आयसीयू उभारण्यात येत आहे. उप जिल्हा रुग्णालय आणि हरसूल, गिरणारे येथील ग्रामीण रुग्णालये आवश्यक ती उपकरणे, औषधांच्या साठ्यासह सुसज्ज करण्यात आली आहेतइगतपुरी, टाकेद, कावनई, सप्तशृंगीगड येथील वैद्यकीय सुविधा देखील सक्षम करण्यात येत आहेत. तर नाशिक-त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या महामार्गांवरील दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये मनुष्यबळासह पुरेशी साधनसामग्री देण्यात आली आहे.

जलजन्य आजार, साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी पाणी शुद्धीकरणासह विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाने केल्या आहेत. खाजगी रुग्णालयांनीही आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टिने जिल्हा प्रशासनाबरोबर समन्वय साधला असून पर्वणी काळात सक्षम वैद्यकीय सेवा पुरविण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी आरोग्य सेवा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
--------
मोटारसायकल ॲम्ब्युलन्सचा होणार वापर
अरुंद रस्ते, गल्ली-बोळात जिथे रुग्णवाहिका जाणे शक्य नसेल अशा ठिकाणी मोटारसायकल ॲम्ब्युलन्सची सुविधा देण्यात येणार आहे. या दुचाकीवर फोल्डिंग स्ट्रेचर आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन डॉक्टर आणि त्यांचा सहाय्यक ज्या ठिकाणी  वैद्यकीय मदतीची गरज आहे, तिथे पोहोचेल. गरजू रुग्णांवर प्रथमोपचार करुन  स्वयंसेवकांच्या मदतीने फोल्डिंग स्ट्रेचरद्वारे त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले जाईल.
--------
किशोर गांगुर्डे, नाशिक २७ ऑगस्ट २०१५

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Excellent response from passengers for Railway Ticket Reservation Mobile Van

‘सिंहस्थ संवाद’ : महान्यूजच्या माध्यमातून

कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीची माहिती देणारी ‘सिंहस्थ संवाद’ मालिका सोमवारपासून आकाशवाणीवर