पहिल्या शाही स्नानासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरचे घाट सज्ज

घाटांवर आगमन-निर्गमनासाठी स्वतंत्र सेवा आणि पोच रस्त्यांची सुविधा

नाशिक, दि. 26:- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीची  तयारी आता पूर्ण झाली असून स्नानासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे बांधलेले घाट सज्ज झाले आहेत. या घाटांना जोडणाऱ्या सेवा आणि पोच रस्त्यांमुळे भाविकांचे घाटांवरील आगमन व निर्गमन सुकर होणार असून भाविकांना शांततेत आणि विनाव्यत्यय स्नान करता येईल, यादृष्टिने प्रशासनाने नियोजन केले आहे.   



सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी देश-विदेशातील लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरला येतातपारंपारिक शाही स्नानाचे ठिकाण असलेल्या नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर यावर्षी पर्वणीच्या काळात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून नाशिक शहरात सात आणि त्र्यंबकेश्वर येथे तीन घाटांवर भाविकांना स्नान करता येईल, याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. नाशकात रामकुंड, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर, लक्ष्मीनारायण, टाकळी संगम, नांदूर आणि दसक पंचक या सात रामघाटांवर आणि  त्र्यंबकेश्वर येथील अहिल्या घाटआचार्य श्री श्रीचंद घाटनवनाथ घाट या तीन घाटांवर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे

बारा वर्षांपूर्वीच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापेक्षा यंदाच्या वर्षी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील घाटांच्या लांबीमध्ये मोठी वाढ केली आहे. नाशिक येथील घाटांची लांबी 1290 मीटर होतीती यावर्षी 3990 मीटर इतकी तर त्र्यंबकेश्वर येथील 200 मीटर अंतराचे घाट 950 मीटर लांबीचे करण्यात आले आहेतघाटांच्या वाढवलेल्या लांबीचा स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा लाभ होणार आहे.  जलसंपदा विभागाने नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरातील घाटांच्या निर्मितीसाठी, घाट परिसर विकास, सेवा रस्ते, पोचरस्ते आणि घाटांच्या विद्युतीकरणाचा सुमारे 169 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला, त्यातून नाशिक शहरात सुमारे 2.6 किलोमीटर लांबीच्या  7 घाटांची तर त्र्यंबकेश्वर येथे 800 मीटर लांबीच्या 5 घाटांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे.  घाटांना समांतर रस्ते, रॅम्प, पोच रस्त्यांची सर्व कामे पूर्ण झाली असून ते वॉटरबाउन्ड मेकॅनिक (डब्ल्यूबीएम) तंत्राने तयार केलेले आहेत. भाविकांना सहजपणे ये-जा करता यावी, दुर्घटना घडू नये यावर विशेष भर देण्यात आला आहे. या सर्व घाटांवर भाविकांना स्नानासाठी आगमन व निर्गमनाची स्वतंत्र सुविधा निर्माण केल्यामुळे भाविकांची गर्दी रेंगाळणार नाही शिवाय चेंगराचेंगरीसारख्या घटना देखील घडणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.  

जलसंपदा विभागासाठी घाट बांधण्याची संकल्पना नवीन होती, मात्र जलसंपदा विभागाच्या नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेच्या तज्ज्ञांकडून संकल्पन चित्र तयार करुन घेऊन त्यानंतर घाटांची निर्मिती केली गेली. ते करीत असताना गुणवत्तेचे काम करण्याचा प्रयत्न अभियंत्यांनी केला. गुणवत्ता नियंत्रण विभाग आणि एका वेगळ्या यंत्रणेमार्फत कामाचे परीक्षण करण्यात आले. घाटांच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदींनीही प्रशंसा केली आहे. गोदावरी नदीत पाणी वाहते राहील, यावर जलसंपदा विभागाचे लक्ष असून स्नान किंवा इतर कारणाने दूषित होणारे पाणी बदलाचेदेखील नियोजन करण्यात आले आहे, असे जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता एम. के. पोकळे यांनी सांगितले.

भाविकांना घाटांवर येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, घाटांना जोडणारे पोच आणि सेवा रस्ते, रॅम्प आदी सुविधांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना स्नानाचा आनंद घेणे सहज, सोपे होणार आहे. आखीव-रेखीव, अतिशय देखणे आणि दर्जेदार काम झालेले नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील स्नान घाट सर्वांसाठीच आकर्षण केंद्र ठरले असून घाटांमुळे या तीर्थक्षेत्रांचे रुपडे अधिक खुलले आहे.


दृष्टिक्षेपात…मार्गनिहाय स्नानघाट

नाशिक येथील सात घाट
§  मुंबई व त्र्यंबकेश्वरकडून येणाऱ्या भाविकांसाठी लक्ष्मीनारायण रामघाट
§  त्र्यंबकेश्वरकडून पायी येणाऱ्या भाविकांसाठी गौरी पटांगण
§  इंदौर,धुळेकडून आग्रारोडने येणाऱ्यांसाठी नांदूर-मानूर रामघाट
§  दिंडोरीकडून येणाऱ्यांसाठी टाळकुटेश्वर रामघाट
§  औरंगाबादकडून येणारे भाविकांसाठी नांदूर-मानूर व टाकळी संगम रामघाट
§  पुण्याकडून येणाऱ्या भाविकांसाठी दसक रामघाट 
§  गिरणारे, दुगाव,पेठकडून येणाऱ्यांसाठी गांधी तलाव रामघाट

त्र्यंबकेश्वर येथील तीन घाट
§  मुंबई, घोटीकडून येणाऱ्या भाविकांसाठी नवनाथ घाट
§  ठाणे, जव्हारकडून येणाऱ्या भाविकांसाठी अहिल्या घाट
§  नाशिक आणि गिरणारे, रोहिलेकडून येणाऱ्यांसाठी आचार्य श्रीश्रीचंद घाट
 00000
किशोर गांगुर्डे, नाशिक, 26 ऑगस्ट 2015

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Excellent response from passengers for Railway Ticket Reservation Mobile Van

‘सिंहस्थ संवाद’ : महान्यूजच्या माध्यमातून

कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीची माहिती देणारी ‘सिंहस्थ संवाद’ मालिका सोमवारपासून आकाशवाणीवर