त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांना थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा


प्रत्येक आखाड्यात बसवली 25 हजार लीटरची पाण्याची टाकी

नाशिक, दि.7- सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर नगरीतील आखाड्यांना यंदा टॅंकरने पाणीपुरवठा न करता जलशुद्धीकरण केंद्रातून थेट जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने केले आहे. प्रत्येक आखाड्यांमध्ये 25 हजार लीटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्याने आखाड्यांना एक चांगली सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे.

 त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात येथील जनतेला, साधू-महंत व भाविकांना पुरेसे शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली आहे. त्र्यंबकेश्वर शहराची  लोकसंख्या आणि येथे येणारे भाविक, साधू-महंत अशा अंदाजे 25 लक्ष जणांसाठी 54.85 लक्ष लीटर पाण्याचे नियोजन केले आहे. त्यात त्र्यंबकेश्वर शहर, आखाडे, साधुग्राम, इतर तंबू व आखाडे, वेळेवर येणारे साधू, भाविक आणि पोलीसांचा समावेश आहे.

कुशावर्त कुंडातील जलशुद्धीकरण यंत्रणा, शहरातील अंतर्गत जलवाहिन्या, आखाड्यांना थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा आणि गौतमी गोदावरी धरणावरुन 2.60 दशलक्ष लीटर्स क्षमतेची पाणीपुरवठा योजना, जुन्या योजनेची दुरुस्ती तसेच नील पर्वतावरील जलशुद्धीकरण केंद्रासाठी जीवन प्राधिकरण विभागाने 30.32 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता, त्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. कुशावर्त कुंडातील जलशुद्धीकरण यंत्रणेची चाचणी देखील पूर्ण झाली असून पर्वणी काळात ही यंत्रणा कार्यन्वित केली जाणार आहे. त्र्यंबकेश्वर शहराच्या ज्या भागात पाण्याची वितरण व्यवस्था नाही अशा ठिकाणी जलवाहिन्या टाकल्यामुळे नागरिकांना देखील योग्य दाबाने पुरेसे पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.

शहरातील 10 आखाड्यांमध्ये पूर्वी पाण्याच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या, तेथे टॅकरने किंवा नळाने पाणीपुरवठा केला जात असे. मात्र आता प्रत्येक आखाड्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाईपलाईन टाकण्यात आली असून महंत व साधूंची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक आखाड्याकरिता 25 हजार लीटर्स क्षमतेच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी आता पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांनी सांगितले.  

त्र्यंबकेश्वरशिवाय कावनई, पेगलवाडी, सप्तशृंगीगडावरही जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या वतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्राधिकरणामार्फत नाशिक-त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या महामार्गांवर ओझर, चांदवड, इगतपुरी येथे प्याऊची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  एकूणच, सिंहस्थ कुंभमेळा काळात त्र्यंबकेश्वर नगरीत येणाऱ्या भाविक-साधू-महंतांना पाण्याची कुठलीही कमतरता जाणवू नये याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रयत्नशील आहे. 
00000

किशोर गांगुर्डे,नाशिक, दिनांक  7 ऑगस्ट 2015 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Excellent response from passengers for Railway Ticket Reservation Mobile Van

‘सिंहस्थ संवाद’ : महान्यूजच्या माध्यमातून

कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीची माहिती देणारी ‘सिंहस्थ संवाद’ मालिका सोमवारपासून आकाशवाणीवर