रेल्वे तिकिट आरक्षण मोबाईल व्हॅनला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

आरक्षित - अनारक्षित तिकिटांसाठी मध्य रेल्वेच्या विविध उपाययोजना

नाशिक, दि. ५- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून येणाऱ्या - जाणाऱ्या भाविकांचा रेल्वे प्रवास आता अधिक सोपा आणि आरामदायी  होणार आहे प्रवाशांचा रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी त्यांना आरक्षित तिकीटे सहज उपलब्ध करुन देणारी  रेल्वे तिकिट आरक्षण मोबाईल व्हॅन  शहराच्या मुख्य चार भागात सुरु करण्यात आली आहे. या मोबाईल व्हॅनमधून आरक्षित रेल्वे तिकिटांना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय मध्य रेल्वेने प्रवाशांना लवकर व सहज आरक्षित -अनारक्षित तिकिटे उपलब्ध व्हावीत यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.


सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली पर्वणी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे नुकतीच पार पडली, या पर्वणीसाठी आलेल्या भाविकांना तसेच शहरातून रेल्वेने प्रवास करु इच्छिणाऱ्या प्रवाशांना आरक्षित - अनारक्षित रेल्वे तिकिट सहज उपलब्ध व्हावे म्हणून मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ‘रेल्वे तिकिट आरक्षण मोबाईल व्हॅनयाच उपाययोजनांचा एक भाग असून नाशिक शहरात सध्या ही मोबाईल व्हॅन रेल्वे प्रवाशांसाठी उपयुक्त ठरली आहे.
२८ ऑगस्टपासून रेल्वे तिकिट आरक्षण मोबाईल व्हॅन  नाशिक शहरात फिरत असून साधुग्राम, पंचवटी, निमाणी व मेळा बसस्थानक या ठिकाणी ही मोबाईल व्हॅन दिवसभर फिरते. इंटरनेट जोडणीयुक्त संगणक, आवश्यक ते सॉफ्टवेअर्स, प्रिंटर्स, बॅटरी बॅकअप आदी साहित्य असलेल्या या व्हॅनमध्ये रेल्वेचे बुकिंग कर्मचारी बसलेले असतात. सोबत रेल्वे सुरक्षा दलाचे जवान असतात.   प्रवाशांना संपूर्ण भारतातील कोणत्याही रेल्वेचे, मार्गावरचे तिकिट या मोबाईल व्हॅनमधून आरक्षित करता येऊ शकते. तात्काळ आणि नियमित तिकिटांबरोबरच विविध कोट्यामधील आणि ज्येष्ठ नागरिक, अपंग आदी सवलतींची तिकिटेसुद्धा या मोबाईल व्हॅनमधून आरक्षित होत असल्याने  त्याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  ३० सप्टेंबरपर्यंत ही रेल्वे तिकिट आरक्षण मोबाईल व्हॅन शहरात कार्यन्वित राहणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथे चार तिकिट खिडक्या...
नाशिक शहराप्रमाणेच त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी जुन्या बसस्टॅण्डजवळ रेल्वे तिकिट आरक्षण केंद्र कार्यन्वित करण्यात आले असून तेथे दोन काऊन्टर उघडण्यात आले आहे. त्याशिवाय २ जनरल तिकिट खिडक्याही उघडण्यात आल्या असून तेथेही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नाशिकरोड , देवळाली ओढा स्थानकात अतिरिक्त तिकिट खिडक्या
प्रवाशांना रेल्वेचे अनारक्षित (जनरल) तिकिट सहज उपलब्ध व्हावे यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या सध्याच्या ७ तिकिट खिडक्यांव्यतिरिक्त नव्याने ३ तिकिट खिडक्या उघडण्यात आल्या आहेत. स्टेशनच्या सिन्नरकडील बाजूस ४, भाविक ज्या भागात थांबणार आहेत, त्या मालधक्का (गुडस शेड) येथे  जनरल तिकिटांसाठी १५ आरक्षित तिकिटांसाठी १ व चौकशीसाठी २ काऊंटर उघडण्यात आले आहेत. सुभाष चौकातील भागातही २ काऊंटर उघडले आहेत.  
नाशिकरोड आरक्षण केंद्रात  सध्याच्या चार काऊन्टरव्यतिरिक्त नव्याने ४ काऊंटर सुरु करण्यात आले आहेत. नाशिकरोड रेल्वे स्थानकात ३ ऑटोमॅटिक तिकिट वेंडिंग मशीन्स लावण्यात आले आहेत. ओढा आणि देवळाली रेल्वे स्थानकात सध्याच्या एक व्यतिरिक्त नव्याने प्रत्येकी जनरल तिकिट काउंटर उघडण्यात आले आहेत तर, देवळालीत २ आरक्षण खिडक्यांव्यतिरिक १ अतिरिक्त खिडकी नव्याने उघडण्यात आली आहे नाशिक शहरात जनता तिकिट बुकिंग सेवकही कार्यरत आहेत.
000000
किशोर गांगुर्डे, नाशिक, ५ सप्टेंबर २०१५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Excellent response from passengers for Railway Ticket Reservation Mobile Van

‘सिंहस्थ संवाद’ : महान्यूजच्या माध्यमातून

कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीची माहिती देणारी ‘सिंहस्थ संवाद’ मालिका सोमवारपासून आकाशवाणीवर