सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवांचे पेव!
सत्यता पडताळूनच
पोस्ट, शेअर वा फॉरवर्ड करा
कोरोना विषाणूच्या संकटाला परतवून लावण्यासाठी राज्य सरकार, प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणा जीवाची पर्वा न करता अहोरात्र कार्यरत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर कोरोना विषाणूच्या संदर्भात अफवा आणि चुकीच्या माहितीचा अक्षरक्षः महापूर आला आहे, कोणतीही माहिती पोस्ट, शेअर किंवा फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
‘कोरोना विषाणू ॲण्टिबायोटिक्स, पॅरासिटेमॉल घेतल्याने तसेच कारल्याचा रस पिल्याने बरा होतो’, ‘डास, मच्छर चावल्याने कोरोना विषाणू पसरतो’, ‘केंद्र सरकारने पीएम मास्क योजना सुरू केली आहे, अमूक एका लिंकवर क्लिक करा आणि फ्री मास्क मिळवा’, ‘रात्री 11 ते पहाटे 5 च्या दरम्यान भारत सरकार कोरोना व्हायरसवर विमानाद्वारे गॅस व्हॅक्सिन फवारणार असून घराबाहेर पडू नका’, ‘संपूर्ण देश लॉकडाऊन होणार आहे’ ‘कोरोना रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटल्सची यादी’, ‘महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, सिक्कीम या चार राज्यात 14 ते 21 मार्च या कालावधीत सुट्टी जाहीर केल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे परिपत्रक’ यासारख्या खोट्या मेसेजेसचा सध्या सोशल मीडियावर महापूर आला आहे. फोटो, टेक्स्ट, ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपातील या मेसेजेसला कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत असतानाच सोशल मीडियावरच्या या खोट्या, चुकीच्या संदेशांनी जनतेत भीती आणि दहशत निर्माण केली जात आहे. कोरोना विषाणूंविषयी समाजमाध्यमांवर खोट्या बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र सायबरने मार्गदर्शिकादेखील यापूर्वीच जारी केली आहे, अशा प्रकारच्या खोट्या कृत्यामध्ये सहभागी न होता दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्याला व्हॉटसअपवर आलेली एखादी पोस्ट खोटी अथवा अफवा आढळल्यास अशा अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध जवळच्या स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा www.cybercrime.gov.in
या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 14 मार्च रोजी ‘महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना 2020’ ही अधिसूचना जाहीर केली असून कोणतीही संस्था अथवा व्यक्ती कोरोना संदर्भात खोट्या बातम्या अथवा अफवा पसरवताना आढळल्यास त्यांना ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 च्या कलम 3 अन्वये जबाबदार धरण्यात येणार आहे, शिवाय भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये हा दंडनीय अपराध ठरवला जाणार आहे.
कोरोनाविषयी कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी ‘हे’ करा…
- आपल्याला मिळालेल्या माहितीची वस्तुस्थिती तपासा.
- जुने फोटो, व्हिडिओज ‘कोरोना’च्या नावाने व्हायरल करणे टाळा, सावधानता बाळगा
- माहिती सोशल मीडियावर पोस्ट, शेअर, फॉरवर्ड करण्यापूर्वी विचार करा.
- पोस्ट केलेली माहिती क्षणात जगभरात व्हायरल होत असल्याने काळजी घ्या.
- आपल्या सोशल मीडिया खात्यांच्या प्रायव्हसी सेटिंग्जदेखील तपासून घ्या, आपल्या फ्रेंडसबरोबरच अजून कोण तुमच्या पोस्टस पाहते हे तपासा.
- कोरोनाबाधित रुग्णाचा फोटो, नाव, ओळख समाजमाध्यमांवरून कुठेही उघड करू नका, असे केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली कारवाई होऊ शकते.
- शासनाच्या हवाल्याने चुकीची माहिती पोस्ट करू नका, फॉरवर्ड करू नका
- शासनाच्या अधिकृत विभागांकडून येणारी माहितीच ग्राह्य माना, त्यासाठी अधिकृत आणि व्हेरिफाईड ट्विटर, फेसबुकबरोबरच वेबसाईटला भेट द्या.
कोरोना विषाणूसंदर्भात महाराष्ट्र शासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांच्या अधिकृत माहितीसाठी-
ट्विटर
आणि
फेसबुक
- मुख्यमंत्री सचिवालय- www.twitter.com/CMOMaharashtra
- माहिती व जनसंपर्क - www.twitter.com/MahaDGIPR
- आरोग्य विभाग - www.twitter.com/MahaHealthIEC
वेबसाईट/ब्लॉग
- महान्यूज- www.mahanews.gov.in
- महासंवाद- www.mahasamvad.in
- PIBFactCheck- केंद्र शासनाच्या योजना, धोरणांविषयी तसेच कोरोना विषाणूसंदर्भात प्रसारित माहितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पत्र सूचना कार्यालय, भारत सरकार यांच्या PIBFactCheck या ट्विटर हॅण्डल, फेसबुक पेज आणि pibfactcheck@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.
कोरोना विषाणूविषयी तसेच प्रवासी सल्ला, सुरक्षिततेचे उपाय, मार्गदर्शक तत्त्वे यांच्या अधिकृत माहितीसाठी-
वेबसाईट-
·
आरोग्य मंत्रालय, भारत सरकार- https://www.mohfw.gov.in
·
जागतिक आरोग्य संघटना -
https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019
·
पत्र सूचना कार्यालय- https://pib.gov.in/
ट्विटर
·
आरोग्य मंत्रालय, भारत सरकार- www.twitter.com/MoHFW_INDIA
·
जागतिक आरोग्य संघटना –
www.twitter.com/WHO


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा